in ,

नवी पहाट

अंधार दाटला होता तरी नवी पहाट उगवू लागली होती.

साडेसहा वाजले असतील. सूर्य मावळतीकडे सरकत होता. पक्षी वेगाने आपल्या घरट्याकडे परतत होते. घरट्यात आलेल्या पक्षिणीच्या भेटीला आतुरलेल्या पाखरांनी एकसारखा चिवचिवाट लावला होता. आईच्या आणि मुलांच्या या भेटीने झाडांवर गलका झाला होता.

लोकांची सुद्धा घरी परतायची लगबग चालू झाली होती. घनशामच्या दारात एक एक पोरगा पायात बूट चढवून हजर होत होता. मुलीही तयार होऊन थांबल्या होत्या. काहीजण अजून तयार होत होते. त्यांची वाट बघत थांबलो होतो. लहानगा बंड्या जवळ येऊन थांबला होता. कायम हसतमुख असणारा हा चटचटीत मुलगा आहे. आपण जाऊया म्होरं असा त्याचा कायमचा होरा असायचा. मोठ्या मुलांसोबत धावायला कमी पडायचा नाही असा. त्याचबरोबर पवन, चिंगड्या, अक्षय, जय अशी एक एक लहान मुलं जमा होत चालली.  त्या दिवशी रमेश लवकर कामावरून आला होता वाटतं आणि तो पहिल्यांदाच असा वेळेवर भेटणार होता. नाहीतर तो कामावरून यायला अंधार होतो.

सगळे जमले आणि चला जाऊया असं म्हणून सगळ्यांची पावलं आपोआप चालायला लागली. कोण आलंय, कोण राहिलंय, कोण नंतर येणार आहे अशी विचारपूस करत आम्ही पांदीतून चालत हायवे वर येऊन पोचलो. मग वाहनं बघून सगळ्या मुली आणि लहान मुलांना घेऊन रस्ता ओलांडला. समोरच पुंडलिकचं घर आहे. मी आणि अजित १२वीला असताना अभ्यासाला कधी कधी या घरी यायचो . घराच्या उजवीकडून खारवटीला जाणारा रस्ता आहे.  रानात जाण्यासाठी केलेला कच्चा रस्ता. त्या रस्त्याने आता आम्ही सगळे धावत जाणार होतो. सूर्य डोंगराआड जाऊन लपण्याआधीच आम्हाला ग्राऊंडवर पोहचायचं होतं. एकमेकांसोबत दंगामस्ती करत लहान मुले चालत होती. कोण मधेच दुसऱ्याची तक्रार करत होते. मग महेश त्यांना दरडवत होता. रमेश माझ्यासोबत चालत होता. आमची वेगवेगळ्या विषयावर चर्चा चालली होती. राहुल, महेश, बंट्या आणि रमेश आम्ही सोबतच चालत होतो. बंट्या अधूनमधून एखादा विनोद करून हसवत होता. त्याची विनोदबुद्धी विलक्षण आहे. आत्मविश्वास खूप आहे बंट्या मध्ये. सगळ्यांनी सीरियस विषयात जोक का करतो म्हणून बंट्याला खडसावले.  पण ते सगळं लटकं होतं. कारण आम्हा सगळ्यांना हसायला आवडतं. हसत हसत जीवनाला हवं तसं चालवणारी आम्ही माणसं. गमवायला काही नाही. त्यामुळे काही केलं तरी गमावणार काहीच नाही. उलट, कष्टाचं फळ म्हणून मिळणारच आहे काही ना काही. पण तिथे सुद्धा मिळेल ते स्वीकारायचे धोरण आता आम्ही टाकले होते. हवं आहे ते कसं मिळवायचं याचं प्लॅनिंग तयार होत होते. आणि आमच्या मधला मैत्रीचा धागा एका मजबूत साखळीत रूपांतरित होत होता. ही साखळी वाढतच जाणार आहे याची आम्हाला खात्री वाटत आहे. सगळे एकमेकांचे जिगरी झालो होतो.

रोज जिथून सुरवात करतो त्या ठिकाणी आलो. कोणी लघवीला गेले, कोणी लंगोटा कसून बांधला. लहान मुले स्ट्रेचिंग करायला लागली. मी त्यांचं कौतुक केलं. मोठ्या पोरांनी पण स्ट्रेचिंग केलं. बंट्या रबरासारखा लवत होता.

”अंगात हाडं नायती तेज्या” मह्या बोलला. सगळे हसले.

”ऐ काळ्या, आवर की लवकर. ” राहूल हसत बोलला.

”माझं काय नाय, तुम्हीच थांबलाय. ” बंट्या.

“ऐ बर बर चला चाटदिशी. परत यायला अंधार पडतु मग” रमेश.

मी लहान मुलांना पुढे जायला सांगितलं. मागे प्रेम-बंट्या, राहूल-महेश अशा जोड्या करून धावायला लागले. सगळ्यात मागे मी आणि रमेश. विनायक पाटलाच्या तळ्याच्या पुढे गेलं की चढ लागतो. तो चढ काढून उजव्या बाजूला वळून दोन-तीनशे मीटरचा रस्ता मग डावीकडे वळून सरळ यलाम्माच्या देवळा पर्यंत वरंगळच. त्या रस्त्याने धावताना आम्ही बोलत बोलत धावत होतो. मह्याचं लक्ष होतं लहान पोरांवर. सोन्या जड होता. त्याला थायरॉईडचा त्रास होता. मी विचारले होते की डॉक्टरांनी व्यायाम करायला सांगितलं आहे का, तेव्हा त्याने होय असं उत्तर दिलं होतं. मग त्याला व्यायाम करायला सोबत येण्याची परवानगी दिली होती मी. तो मागे राहिला. मह्या त्याला पळवत होता. थोडं राहिलय म्हणत त्याला पूर्ण टार्गेट पर्यंत नेत होता. सगळी लहान मुलं मोठ्या मुलांनी सांगितलेलं ऐकत होती.

पाटलाच्या हिरीपासून वर गेलो. मग मी आणि रमेश बोलत चाललो.

“रोज लवकर येत जा की. ” मी रमेशला म्हणालो.

“न्हाय वं वस्ताद, काम असतंय दुकानात. आता तीन दिवस सावळज बंद राहणार म्हणून आलोय लवकर. ” रमेश त्याच्या कामाबद्दल सांगितले. तो सावळज मध्ये शेतकी औषधाच्या दुकानात कामाला जातो. त्याची पदवीही शेतीसंबंधी विषयातीलच आहे. तो चांगली नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत होता.

“ओके, जवा टाईम मिळंल तवा येत जा. आपल्या पोरांवर लक्ष देत जा. ” मी त्याची अडचण समजून घेऊन बोललो.

“नाय एवढी काय आपली गरज नाही. बंट्या, राहूल, मह्या देत्याती लक्ष.  आणि मला लय यीव वाटतं व्यायामला. पण टाईम नाही भेटत. आधीपण माझा व्यायाम चालूच होता की.” रमेश.

“होय, पोरं लक्ष देतात. बरोबर हाय, पण मोठी पोरं असली की जरा वेगळं असतंय. त्यात विशालला पण टाईम भेटत नाही. काम असतंय दुकानात. नायतर विशाल असला की काय टेंशन नसतं आपल्याला. ” मी.

“व्हय सिद्धार्थ दादा? तुम्हाला ती टिकटॉक वरचं एका पोराचं व्हिडिओ पाठवलुतं बघा. कसं वाटलं तुम्हाला? ” रमेशने विचारलं.

“चांगले केलेत. हे सर्व लोकांना सांगायचा प्रयत्न आपली पोरं करतात. पण अजून लोकं काय भक्ती करतात नेत्यांची आणि जुनाट विचार सोडत नायत. ” मी हे बोलतानाही आशावादी होतो. कारण आमची वृत्ती परिवर्तनवादी झाली होती.

रमेश मला नवीन काही माहितीपूर्ण आलं की फॉरवर्ड करतो. मग आम्ही त्या माहितीची सत्यता तपासून ग्रुपमध्ये चर्चा घडवून आणायचो. अस्पृश्यता पालनाबाबतीत सुद्धा मी स्वतः खूप संदर्भ शोधले होते. ते सगळे मी या माझ्या मित्रांसोबत शेअर करायचो. रमेश आणि मी असलो की चर्चा करतच रनिंग करायचो.

एक किलोमीटरहून अधिक धावलो असेल तेव्हा यल्लम्मा देवीचं मंदिर लागलं. गावाबाहेरचा बामनकीतून वाहत येणारा ओढा सरळ जाऊन तलावात विसर्जित होतो. जिथं ओढा तलावाला मिळतो त्या मुखापासून शे-दोनशे मीटर पाठिमागे ओढ्यात हे मंदिर आहे. लहानपणी आजोबांच्या खांद्यावर बसून जत्रेला यायचो. तेव्हा बैलगाडी, घोडागाडी, घोड्यांच्या शर्यती आजोबांच्या खांद्यावर बसूनच पाहिल्या होत्या. सकाळच्या शर्यती झाल्या की मग एखादं गारीगार आजोबा घेऊन द्यायचे. मग परत दुपारनंतर आजी, सगळ्या आत्या, ताई, आत्यांची मुले असे आम्ही सगळे मिळून जत्रेला यायचो. तेव्हा काही समजायचं वय नसेल कदाचित. खायला मिळतं, फुगे, खेळणी मिळतात एवढाच काय तो उद्देश असावा. पण सहावीला असताना गाडगेबाबांच्या जीवनाशी परिचय झाला. आणि ‘देवाचं भूत’ मनातून खाडकन उतरलं. तेव्हा तर लहान असताना सुद्धा मनात थोडीसुद्धा भिती राहिली नाही. त्याच वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राचे वाचन करायला मिळाले. खूप गोष्टी उलगडत होत्या. मनातून भिती हद्दपार झाली होती. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत हे मनात पक्के झाले. मग प्रयत्नवादावर विश्वास जास्त दृढ झाला. सहावीत संपत नलवडे या शिक्षकांनी देव वगैरे काही नसतं, सगळ्या अंधश्रद्धा असतात या संबंधी खूप विनोदी कथा सांगितल्या होत्या. पण ते स्वतः मात्र जत्रेला दिसत, कपाळी भंडारा गुलाल दिसे, पण तरीही मी मात्र विचलित झालो नाही. ती भिती कधीच हद्दपार झाली होती. सातवीत असताना पुढे भास्कर सदाकळे यांचं अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित विनोदी व्याख्यान पाहायला- ऐकायला मिळालं. तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती माहिती झाली. दाभोळकर माहिती झाले. तर, त्या देवळाजवळ आलो की मला एक गोष्ट नक्की आठवायची ती म्हणजे देवदासी प्रथा. त्यावर आधारित उत्तम कांबळे यांचं एक पुस्तक सुद्धा वाचलं होतं. बहुतेक मुरळ्या किंवा देवदासी या मातंग आणि महार समाजातीलच असायच्या. या गोष्टी मनाला डंख करत राहतात. देवळाजवळून जाताना सुद्धा मनात एक सनक येऊन जायची. धर्माने लादलेली गुलामगिरी, कमावण्याचे अधिकार नाहीत, त्यात पर्मनंट भिकारी बनवणाऱ्या असल्या प्रथा! प्राध्यापक सुकुमार कांबळे सरांचं एक वाक्य आहे ‘सगळे रेड्या-बोकडाचे देव आम्हाला आणि पेढं-साखरेचे तुम्हाला…’ आमच्या शेजारचा सुजेत कांबळे(दाद्या) हा ही असंच बोलायचा. आपल्या देवाला मटण न् दारू शिवाय जमत नाही. आणि आम्ही खूप हसायचो.

आता सूर्य मावळतीच्या जवळ पोचला होता. थोड्याच वेळात तो क्षितीजापलीकडे गुडुप होऊन अर्ध्या जगाला विश्रांतीसाठी सोडून देणार होता. देवळापुढे उजव्या बाजूला वळून पुढे जायचं म्हणजे तो सरळ तीन चारशे मीटरचा चढ. इथेच सगळ्यांचा वेग वाढायचा. तसं पहिल्या दिवसापासून शिकवलंच होतं. प्रत्येक गोष्टीला त्या छोट्या मोठ्या मित्रांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. वेदना सहन करायचे पण माझा शब्द पडू देत नव्हते. ज्यांचा सराव नव्हता किंवा वजन जास्त होते ते सुद्धा मनापासून प्रयत्न करत होते. मी आणि रमेशने सुद्धा वेग वाढवला. महेश, राहूल, बंटी, प्रेम, बंड्या, खोंड्या आणि बाकिचा सगळा ग्रुप आमच्या पुढे गेला होता. त्यापैकी महेश, प्रेम, राहूल, बंट्या यांनी न थांबता माळाचा दोन किलोमीटरचा राऊण्ड सुरु केला होता.लहान मुले एक एक करत व्यायाम करायच्या जागी पोहोचत होती. काही पोचले होते. मी थांबलो, शरीर घामाने डबडबलं होतं. कपडे ओले झाले होते.

“तू कंटिन्यू कर पुढे. पाहिजे तर त्यांच्यासोबत जा ” मी थांबताना रमेशला म्हटलं.

“बरं, तुम्ही या काय मग सिद्धार्थ दादा.” असं म्हणून रमेश धावत पुढे निघून गेला.

मी मागून बघत होतो. उत्साहाने सगळे धावत होते. लहान मुले मोठ्यांची बरोबरी करत होती. सूर्य अर्धा डोंगराआड झाला होता. क्षितीजरेषा लाल भडक झाली होती. आभाळाच्या आरशातून परावर्तित होऊन तो लाल रंग पृथ्वीला भिजवत होता. रंगांचं शिंपण झाडांच्या शेंड्यांना अधिक मनमोहक बनवत होते. समोर पायवाटेवरून धावणारे ते लहानगे जीव एका उज्ज्वल भविष्याची आस धरून धावत होते. माझ्या डोळ्यांत पाणी जमा झाले होते. हात खिशात गेला. मोबाईल काढला. कॅमेरा ऑन केला. रमेशला हाक मारली. त्याने मागे वळून पाहिले. काय वस्ताद म्हणून प्रतिसाद दिला. ‘काही नाही, जा पुढे’ असे म्हणताच त्याने हात वर करत ‘ओके वस्ताद’ असं म्हणून परत धावायला सुरवात केली. मी त्या चिल्यापिल्यांना कॅमेऱ्यात टिपून घेतलं. गेले दिड-दोन महिने त्यांनी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला होता. ते कधीही विसरता न येणारे क्षण होते. मी विचार करत होतो. पुढे काय होणार, हे सुरू राहणार का? ‘मोठ्यांनी असं वागावं की लहानांनी आदर करावा. लहान मुलांच्या समोर एकमेकांशी बोलताना चुकीचे शब्द टाळावेत. लहानांनी बरोबरीच्या मित्राशी थट्टा मस्करी करावी, मोठ्यांचा मान राखावा, त्यांनी सांगितलेलं ऐकावं’ हे लक्षात ठेवलं जाईल का? विशाल, पंकज, रमेश ला वेळ मिळेल का? लहान मुलांना मनमोकळं पण पोषक वातावरण तयार करण्याचा हा प्रयत्न सफल होईल का? असे कित्येक प्रश्न मनात उगवू लागले.

मोबाईल खिशात ठेवला. राऊण्ड मारायला गेलेल्या मुलांना दुसऱ्या बाजूने सामोरा गेलो. ते सगळेजण हायवेला लागून असलेले दोनशे मीटरचे अंतर पार करून डावीकडे वळले होते. बजरंग पाटलांच्या द्राक्षांच्या बागा मधे असल्याने धावणारे मुक्तीसैनिक अजून दिसत नव्हतेे. रस्त्याच्या बाजूने ठराविक अंतराने लावलेली चार पाच वडाची झाडे होती. हायवे सोडून तलावाकडे जाणाऱ्या या रस्त्यावरून ते पुढे आले. मोठ्या वडाच्या बाजूने धावत येत असलेले ते नजरेस पडू लागले. सगळ्यांनी समान वेगाने, एका गतीने पावले टाकण्यास सुरवात केली होती. मी हात उंचावला. वेग वाढवण्याचा इशारा केला. तसा त्यांचा वेग अजून वाढला. हळूहळू वाढतच राहिला. माझ्यापर्यंत पोहोचले तेव्हा घामाने डबडबले होते ते. सगळेजण एका लयीत धावताना छान वाटले. मग परत त्यांच्यासोबत मैदानापर्यंत हळूहळू धावत गेलो. सगळ्यांचं कौतुक केलं. नेहमीप्रमाणे बंट्यासोबत मस्करी, मह्याचे प्रश्न चालू झाले. धावताना काय विचार केला हे सगळेजण सांगू लागले. बंड्या खूष होता. त्याला रनिंग मध्ये खूप रस निर्माण झाला होता. मैदानावर पोहोचलो. अंधार पडला होता. व्यायाम चालू असताना विशालची कार येताना दिसली. मणेराजुरीला त्याचं दुकान आहे. तिकडून सरळ मैदानावर आला होता तो. पंकजही पोचला होता. लहान मुलांचा व्यायाम तो स्वतः घेत होता. रोजचा ठरलेला व्यायाम झाला. मग पंधरा मिनीटे अभ्यासाची उजळणी. आणि मग प्रतिज्ञा.

“मैत्री हीच माझी शक्ती आहे. आणि मैत्री हाच माझा धर्म. संघटनेमध्ये शिकवलेले गुण अंगी बाणवून मी समाजाची काळजी घेणारा चांगला माणूस बनणार…. ” रमेश पुढे उभा राहून प्रतिज्ञा घेत होता आणि आम्ही सगळे मागे म्हणत होतो. थोड्या वेळापूर्वी मनात निर्माण झालेले प्रश्न शांत होत होते. सगळी उत्तरे ती प्रतिज्ञा देत होती….

‘मैत्री हीच माझी शक्ती आहे’… त्या घनघोर अंधाराला चिरत निर्भीडतेची ती प्रतिज्ञा एका धीरगंभीर पण उत्साही आवाजात घुमत होती. अंधार थरथरत होता. केव्हाही त्याचा मुडदा पाडणारा प्रज्ञासूर्य काळाच्या क्षितीजावर उगवू लागला कि अंधार घाबरतो. आज तर कित्येक प्रज्ञासूर्य साक्षात उभे होते. त्यांच्या अंतरंगात जुन्याचे स्फोट होत होते. नवीन विचारांची अभिक्रिया सुरू झाली होती. ती पुढे जाऊन मोठ्या प्रकाशाला जन्म देणार होती. राहूल, प्रविण (बंट्या), महेश, रमेश, विशाल, पंकज, निखिल असे कित्येक उजेडाचे सारथी आता तयार होत होते….  जय लहुजी, जय उमाजी, जयभिमची ती ललकारी नव्या युगाला साकारायला सज्ज झाली होती….

अंधार दाटला होता तरी नवी पहाट उगवू लागली होती.

-सिद्धार्थ सावंत

( ही आठवण लिहायला घेतली तेव्हा महेश, राहुल अॅकॅडमीला गेले होते. जे खूप गरजेचं होतं. विशाल,  रमेश, बंटी  पंकज संघटनेत लक्ष घालत आहेत. बंटी रोज व्यायाम घेतो. अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्रम सुद्धा घेतला होता. सगळे व्यवस्थित चालू आहे. )

The views and opinions expressed by the writer are personal and do not necessarily reflect the official position of VOM.
This post was created with our nice and easy submission form. Create your post!

What do you think?

Comments

Leave a Reply

Leave a Reply

Your email address will not be published.

Loading…

0

Comments

0 comments